🛑 महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्गात संपन्न होणार : राज्याध्यक्ष मा. कल्याणराव दळे
सिंधुदुर्ग ( कणकवली ) :
नाभिक समाजाला योग्य दिशा मिळावी , नाभिक मुलांना शिक्षणाचे मार्ग खुले व्हावेत , नोकरीत आरक्षणे मिळावीत यादृष्टीने राज्य नाभिक संघटनेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जात असतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणीची सभा लावून नाभिक ज्ञातीबांधवांना वेळीच जागृत करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्गातही लवकरच दौरा आयोजित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांनी फोन संदेशाद्वारे राज्य , जिल्हा पदाधिकाऱ्यांशी बोलताना केले.
कोरोनामुळे संघटनात्मक कार्यात विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ऑनलाईन सभेमधील मार्गदर्शनावर समाधान मानावे लागले होते. परंतु आता पुन्हा एकदा नाभिक समाजाला एकत्र येऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्याने विविध जिल्ह्यांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. त्याद्वारे लोकमानस जाणून घेऊन तळागाळातील नाभिक बांधवांमध्ये जनजागृती घडून यावी हा मुख्य उद्देश असणार आहे.
काँफरन्स कॉल सुरु असताना त्यामध्ये राज्य प्रदेश सरचिटणीस राजन पवार , राज्य प्रांत संघटक विजय चव्हाण , सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि कणकवली नाभिक संघटनेचे सचिव प्रवीण कुबल सहभागी झाले होते.
त्यासंदर्भात सोमवारी १८ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी साडे पाच ते सात वाजेपर्यंत दिड तासांची जिल्हास्तरीय नियोजन सभा ऑनलाईन संपन्न होणार आहे. सदर सभेला सर्व तालुक्यातील अध्यक्ष , सचिव , सर्व नाभिक बांधवांनी , सलून व्यावसायिकांनी वेळीच ऑनलाईन उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
.jpeg)