Sunday, April 19, 2020

नाभिक व्यवसायासाठी ' लॉकडाऊन ' शिथिल केलेले नाही : जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर

कणकवली : दिनांक : १९ एप्रिल २०२० :
                  नमस्कार ......सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या नाभिक बंधू आणि भगिनींनो ....आपणांस मनापासून नमस्कार....संपूर्ण जग सध्या लॉकडाऊन झाले आहे. त्यात भारताने लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवले आहे. आपला नाभिक व्यवसाय २१ मार्च पासून बंद आहे. ३ मे पर्यंत ४४ दिवसांचा दीर्घ कालावधी म्हणजे आपल्यासाठीचा अत्यंत दुःखदायक कालावधी आहे. आपली सहनशीलता संपण्याची भीती आम्हाला पहिल्या ३ दिवसांपासूनच वाटत आलेली आहे. तरीही आज ३० दिवस म्हणजेच बरोबर एक पूर्ण महिना आपण लॉकडाऊन पाळलेले आहे. आपण सर्व नाभिक बांधव धन्य आहात . वरिष्ठ पातळीवरून जसे आदेश दिले जातात, तसे आपण पाळत आहोत. त्यांचे उल्लंघन करणे आपल्या रक्तात नाही. पण ज्यावेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उदरभरणाचा प्रश्न येतो. तेव्हा त्याचे उत्तर संघटनाही देऊ शकत नाही. संघटना आपल्याला फक्त जे बरोबर आहे तेवढे सांगण्याचे काम करते. चुकीचे मार्गदर्शन संघटनेकडून केले जाऊ शकत नाही.
                     त्यामुळे आजपर्यंत आम्ही आपल्याला संघटनात्मक आवाहन केलेले होते, आणि यापुढेही संघटनात्मक आवाहनच असणार आहे. ते आवाहन म्हणजे आदेश किंवा ऑर्डर आहे असा गैरसमज कुणीही करून घेऊ नये. फक्त देश व राज्य पातळीवरून बातम्यांच्या स्वरूपात सध्या आपल्याला जे आवाहन केले जात आहे, त्याला अनुसरूनच आम्ही संघटनात्मक आवाहन करत आलो आहोत. तुम्ही ते पाळण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आलेला आहात. तुम्ही घरी सुखरूप असावे, आणि सतत सुखरूप , आरोग्यसंपन्न राहावे अशीच आमची नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना असणार आहे.
                     ३० दिवस गेले, अजून १४ दिवस बाकी आहेत. ते ही जातील. काहीतरी मिळवण्यासाठी कशाचातरी त्याग नेहमीच करावा लागतो. तुम्ही सर्व माझे बांधव आहात, तुम्ही जिथे असाल तिथे भालचंद्र बाबांच्या कृपेने तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत जबाबदारीने केलेला असेल. असो. लॉकडाऊन असेपर्यंत आपल्या नाभिक व्यवसायासाठी अजून परवानगी मिळाल्याबाबत कोणत्याही बातमीमध्ये किंवा प्रसिद्धिपत्रकांमध्ये उल्लेख केलेला आम्हाला दिसून आलेला नाही. आमच्याकडून चुकून वाचायचे राहून गेले असेल तर कृपया आम्हाला जरूर कळवावे म्हणजे इतरांना कळवणे सोपे जाईल. या कठीण प्रसंगी  तुमच्याकडून अधिक सहनशीलतेची अपेक्षा करतो.
                      आपला जिल्हाध्यक्ष - अनिल अणावकर , सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना. 

सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे संकेतस्थळ सुरु

आज कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे संकेतस्थळ सुरु करताना अत्यंत आनंद होत आहे. गेली कित्येक वर्षे जिल्हा संघटनेचे कार्य अतिशय उत्साहाने सुरु आहे. त्याला जगभर प्रसिद्धी मिळावी आणि नाभिक संघटनेचे कार्य सर्वदूर पसरण्याचा दृष्टीने हे संकेतस्थळ सुरु करण्याचा मुख्य उद्देश असणार आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यात आठ तालुका शाखा कार्यरत असून प्रत्येक तालुक्याचे वैशिष्ठयपूर्ण काम सुरु असताना आम्ही पाहत आहोत. ते काम सर्व जगाला समजावे हा संघटनेचा उद्देश आहे. विविध उपक्रम राबवीत असताना ते सगळीकडे समजावेत, त्या उपक्रमांचा इतरांनाही उपयोग व्हावा.तळागाळातील नाभिक बांधवांना आपले ज्ञातिबांधव कोठे काय करत आहेत , ते समजावे. आपला नाभिक विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पाहून कोणाला आवडणार नाही. ते आवडावे आणि आवडण्यासाठी आमचा खारीचा वाटा असावा हे देखील आमच्यासाठी अभिमानास्पद असणार आहे. तरीही काही चुका झाल्यास वाचक आम्हाला वेळोवेळी कल्पना देऊन त्यात बदल करण्यास सांगतील तर ते आम्हाला नक्कीच आवडेल. ज्या सूचनांमधून आमच्या नाभिक बांधवांचा सर्वस्वी विकास होईल यासाठी सर्व प्रकारच्या गोड आणि कडू दोन्ही प्रकारच्या सूचनांचे आमच्या नवीन संकेतस्थळावर स्वागतच आहे.