Saturday, August 8, 2020

Apron वितरण कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम : राजन पवार

कणकवली : दिनांक : ०८/०८/२०२० :

          सध्या ' कोरोना ' प्रादुर्भाव होत असल्यामुळे सलून कारागिरांना अधिक काळजीपूर्वक सेवा द्यावी लागत आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाभिक व्यावसायिकांनी सुरक्षित सेवा देण्याच्या दृष्टीने ' Use & Throw ' Apron चा वापर करणे गरजेचे झाले आहे. ग्राहकांना आरोग्यपूर्ण व निःशंक सेवा द्यायची असेल तर संघटनेने दिलेली आचारसंहिता पाळायला हवी. याची जाणीव जागृती करण्यासाठी दशरथ चव्हाण , रोशन चव्हाण यासारख्या नाभिक कार्यकर्त्यांची गरज आहे. ते राबवत असलेला उपक्रम स्तुत्य असून दोन हजार पेक्षा जास्त नाभिक व्यावसायिकांना युज अँड थ्रो ची चादर वापरण्यास प्रवृत्त केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष राजन पवार यांनी प्रस्तुत उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. 

           जिल्हा नाभिक संघटना सचिव सुधीर चव्हाण यांच्या जेन्टस पार्लर मध्ये आणि मालवण येथील राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी युज अँड थ्रो Apron च्या वितरणाचा उपक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी नाभिक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण , जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, खजिनदार चंद्रशेखर चव्हाण, जिल्हा सचिव सुधीर चव्हाण , कणकवली सचिव प्रवीण कुबल, जिल्हा सल्लागार सुभाष चव्हाण , वेंगुर्ला अध्यक्ष किरण पवार, सावंतवाडी अध्यक्ष वैभव चव्हाण , माजी जिल्हाध्यक्ष सदानंद चव्हाण , जिल्हा सदस्य रुपेश पिंगुळकर. देवगड अध्यक्ष प्रमोद चव्हाण , मालवण अध्यक्ष आनंद आचरेकर, उपक्रमाचे उपक्रमशील शिलेदार दशरथ चव्हाण आणि रोशन चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

          विजय चव्हाण म्हणाले , दशरथ आणि रोशन चव्हाण या तरुणांच्या योगदानामधून तळागाळातील नाभिक व्यावसायिकांपर्यंत ' युज अँड थ्रो ' चादर वापरण्याविषयीची जाणीव पोहचणार आहे. जिल्ह्यातील २१०० नाभिक व्यावसायिकांपर्यंत सदर साहित्य पोहचणार असल्याने ते साहित्य वापरण्याविषयीची सवय निर्माण होणे या घडीला महत्वाचे आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून नाभिक संघटना घराघरात पोहोचणार आहे. इतर तरुणांनी या दोन तरुणांचा आदर्श घ्यावा असे आवाहन करून त्यांना धन्यवाद दिले. 

          अनिल अणावकर म्हणाले, आम्हाला आमच्या नाभिक बांधवांना चांगले संदेश द्यायचे आहेत, कोणत्याही प्रकारे आपल्या ग्राहकांनी आपल्याला नावे ठेवू नयेत , नावे ठेवलीच तर चांगली ठेवावीत. त्यासाठी आपणच काळाप्रमाणे बदलायला हवे. आपण आपल्यामध्ये बदल केला नाही तर ग्राहक आपल्याकडे येताना शंका घेतील. त्यांना खुश करणे , त्यांना हवे असे काम करणे हे आपले कर्तव्य आहे. युज अँड थ्रो च्या साहित्याचा वापर सुरु केल्यामुळे दरामध्ये वाढ करावी लागली आहे आणि सध्या ग्राहकांना सुरक्षित सेवा वाटली तर ग्राहक वाढलेल्या दरपत्रकाचा अजिबात बाऊ करणार नाहीत. कारण बाकी सगळ्या ठिकाणी दर वाढलेले असताना ग्राहक फक्त सुरक्षित सेवा मिळण्यासाठी पैसे मोजायला तयार आहेत. त्यामुळे सर्वांनी ग्राहकांना निर्धोक सेवा द्यावी. आपल्याबद्दलचे ग्राहकांचे मत बदलावे. दशरथ आणि रोशन हे नाभिक संघटनेतील हिरे आहेत, त्यांनी सतत चमकत राहावे असे सांगून दोघांचे बुके देऊन जिल्ह्याच्या वतीने आभार मानले. 

          मालवण तालुका पदाधिकारी जगदीश चव्हाण म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांच्या मनातील भीती जाणे गरजेचे आहे, ही भीती घालवायची असेल तर नाभिक व्यावसायिकांनी युज अँड थ्रो साहित्याची सवय लावायलाच हवी. तसेच सुजाण ग्राहकांनी देखील सुरक्षित सेवा मिळण्यासाठी नाभिक व्यावसायिकांकडे Use & आग्रह धरला पाहिजे. दरवाढीप्रमाणे कारागिरांनी आपल्या कामाचा दर्जा सुधारला पाहिजे. 

          नाभिक संघटनेच्या या स्वच्छताविषयक सवयीच्या उपक्रमाविषयी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून नाभिक बांधवांनी देणगीदारांचे मनापासून आभार मानले आहेत. 

          प्रवासादरम्यान कुडाळ तालुक्यातील पाट येथील विशाल मनोहर चव्हाण या नाभिक बांधवाचे सलून वादळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने पडझड झाली आहे असे समजले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी त्यांची प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. 



















































Thursday, May 21, 2020

नाभिक बांधवांनो, आपल्या जीवाची काळजी घेऊनच काम करा : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक : २१ / ०५ / २०२० :
                    लॉकडाऊन शिथिल असलेल्या काळामध्ये आपल्या नाभिक व्यावसायिकांना प्रशासनाने काम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे २२ मे पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त नाभिक व्यावसायिक उमेदीने काम करायला सज्ज झालेला आहे. गेले ६० दिवस घरात बसून असलेला नाभिक सलून उघडण्याची आतुरतेने वाट पाहात होता. आता त्याची प्रतिक्षा संपली आहे. हातावरचे पोट असल्याने अनेक संकटांचा सामना करत , एकवेळ उपाशी राहूनही काटेकोरपणे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधवांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. पण आता काम करताना सर्व नाभिक बांधवांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेऊनच काम करा असे हृदय आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
                    सर्व सलूनधारकांनी , कारागिरांनी संघटनेने दिलेल्या स्वच्छताविषयक नियमावलीचे कटाक्षाने पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. एकावेळी एकाच ग्राहकाला दुकानात प्रवेश द्यावा. सलूनमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सेवा द्यावी. कोणीही कितीही आग्रह केला तरीही नियमांना अधीन राहूनच सेवा द्यावी. संघटनेने ठरवून दिलेल्या नियमांचेही पालन करावे. नोंदणी रजिस्टर ठेवून त्यात आलेल्या ग्राहकांचे नाव, गाव, संपर्क क्रमांक यांच्या नोंदी ठेवाव्यात. शक्यतो युज अँड थ्रो प्रकारच्या साहित्याचा वापर करावा. कापडी टॉवेल, रुमाल यांचा वापर केल्यास ते निर्जंतुक करून घ्यावेत. वापरावयाचे साहित्यदेखील दरवेळी निर्जंतुक करण्यासाठी डेटॉलचा वापर करावा. सर्व कारागिरांनी व दुकानात प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना मास्क वापरायला बंधनकारक आहे, त्यामुळे कोणताही धोका न पत्करता काळजीपूर्वक काम करून नाभिक व्यवसायाबद्दल विश्वासार्हता वाढवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले आहे. 

Sunday, April 19, 2020

नाभिक व्यवसायासाठी ' लॉकडाऊन ' शिथिल केलेले नाही : जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर

कणकवली : दिनांक : १९ एप्रिल २०२० :
                  नमस्कार ......सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या नाभिक बंधू आणि भगिनींनो ....आपणांस मनापासून नमस्कार....संपूर्ण जग सध्या लॉकडाऊन झाले आहे. त्यात भारताने लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवले आहे. आपला नाभिक व्यवसाय २१ मार्च पासून बंद आहे. ३ मे पर्यंत ४४ दिवसांचा दीर्घ कालावधी म्हणजे आपल्यासाठीचा अत्यंत दुःखदायक कालावधी आहे. आपली सहनशीलता संपण्याची भीती आम्हाला पहिल्या ३ दिवसांपासूनच वाटत आलेली आहे. तरीही आज ३० दिवस म्हणजेच बरोबर एक पूर्ण महिना आपण लॉकडाऊन पाळलेले आहे. आपण सर्व नाभिक बांधव धन्य आहात . वरिष्ठ पातळीवरून जसे आदेश दिले जातात, तसे आपण पाळत आहोत. त्यांचे उल्लंघन करणे आपल्या रक्तात नाही. पण ज्यावेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या उदरभरणाचा प्रश्न येतो. तेव्हा त्याचे उत्तर संघटनाही देऊ शकत नाही. संघटना आपल्याला फक्त जे बरोबर आहे तेवढे सांगण्याचे काम करते. चुकीचे मार्गदर्शन संघटनेकडून केले जाऊ शकत नाही.
                     त्यामुळे आजपर्यंत आम्ही आपल्याला संघटनात्मक आवाहन केलेले होते, आणि यापुढेही संघटनात्मक आवाहनच असणार आहे. ते आवाहन म्हणजे आदेश किंवा ऑर्डर आहे असा गैरसमज कुणीही करून घेऊ नये. फक्त देश व राज्य पातळीवरून बातम्यांच्या स्वरूपात सध्या आपल्याला जे आवाहन केले जात आहे, त्याला अनुसरूनच आम्ही संघटनात्मक आवाहन करत आलो आहोत. तुम्ही ते पाळण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आलेला आहात. तुम्ही घरी सुखरूप असावे, आणि सतत सुखरूप , आरोग्यसंपन्न राहावे अशीच आमची नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना असणार आहे.
                     ३० दिवस गेले, अजून १४ दिवस बाकी आहेत. ते ही जातील. काहीतरी मिळवण्यासाठी कशाचातरी त्याग नेहमीच करावा लागतो. तुम्ही सर्व माझे बांधव आहात, तुम्ही जिथे असाल तिथे भालचंद्र बाबांच्या कृपेने तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत जबाबदारीने केलेला असेल. असो. लॉकडाऊन असेपर्यंत आपल्या नाभिक व्यवसायासाठी अजून परवानगी मिळाल्याबाबत कोणत्याही बातमीमध्ये किंवा प्रसिद्धिपत्रकांमध्ये उल्लेख केलेला आम्हाला दिसून आलेला नाही. आमच्याकडून चुकून वाचायचे राहून गेले असेल तर कृपया आम्हाला जरूर कळवावे म्हणजे इतरांना कळवणे सोपे जाईल. या कठीण प्रसंगी  तुमच्याकडून अधिक सहनशीलतेची अपेक्षा करतो.
                      आपला जिल्हाध्यक्ष - अनिल अणावकर , सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटना. 

सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे संकेतस्थळ सुरु

आज कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे संकेतस्थळ सुरु करताना अत्यंत आनंद होत आहे. गेली कित्येक वर्षे जिल्हा संघटनेचे कार्य अतिशय उत्साहाने सुरु आहे. त्याला जगभर प्रसिद्धी मिळावी आणि नाभिक संघटनेचे कार्य सर्वदूर पसरण्याचा दृष्टीने हे संकेतस्थळ सुरु करण्याचा मुख्य उद्देश असणार आहे. जिल्ह्यात आठ तालुक्यात आठ तालुका शाखा कार्यरत असून प्रत्येक तालुक्याचे वैशिष्ठयपूर्ण काम सुरु असताना आम्ही पाहत आहोत. ते काम सर्व जगाला समजावे हा संघटनेचा उद्देश आहे. विविध उपक्रम राबवीत असताना ते सगळीकडे समजावेत, त्या उपक्रमांचा इतरांनाही उपयोग व्हावा.तळागाळातील नाभिक बांधवांना आपले ज्ञातिबांधव कोठे काय करत आहेत , ते समजावे. आपला नाभिक विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पाहून कोणाला आवडणार नाही. ते आवडावे आणि आवडण्यासाठी आमचा खारीचा वाटा असावा हे देखील आमच्यासाठी अभिमानास्पद असणार आहे. तरीही काही चुका झाल्यास वाचक आम्हाला वेळोवेळी कल्पना देऊन त्यात बदल करण्यास सांगतील तर ते आम्हाला नक्कीच आवडेल. ज्या सूचनांमधून आमच्या नाभिक बांधवांचा सर्वस्वी विकास होईल यासाठी सर्व प्रकारच्या गोड आणि कडू दोन्ही प्रकारच्या सूचनांचे आमच्या नवीन संकेतस्थळावर स्वागतच आहे.