Thursday, May 21, 2020

नाभिक बांधवांनो, आपल्या जीवाची काळजी घेऊनच काम करा : अनिल अणावकर

कणकवली : दिनांक : २१ / ०५ / २०२० :
                    लॉकडाऊन शिथिल असलेल्या काळामध्ये आपल्या नाभिक व्यावसायिकांना प्रशासनाने काम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे २२ मे पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त नाभिक व्यावसायिक उमेदीने काम करायला सज्ज झालेला आहे. गेले ६० दिवस घरात बसून असलेला नाभिक सलून उघडण्याची आतुरतेने वाट पाहात होता. आता त्याची प्रतिक्षा संपली आहे. हातावरचे पोट असल्याने अनेक संकटांचा सामना करत , एकवेळ उपाशी राहूनही काटेकोरपणे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधवांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. पण आता काम करताना सर्व नाभिक बांधवांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेऊनच काम करा असे हृदय आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
                    सर्व सलूनधारकांनी , कारागिरांनी संघटनेने दिलेल्या स्वच्छताविषयक नियमावलीचे कटाक्षाने पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. एकावेळी एकाच ग्राहकाला दुकानात प्रवेश द्यावा. सलूनमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सेवा द्यावी. कोणीही कितीही आग्रह केला तरीही नियमांना अधीन राहूनच सेवा द्यावी. संघटनेने ठरवून दिलेल्या नियमांचेही पालन करावे. नोंदणी रजिस्टर ठेवून त्यात आलेल्या ग्राहकांचे नाव, गाव, संपर्क क्रमांक यांच्या नोंदी ठेवाव्यात. शक्यतो युज अँड थ्रो प्रकारच्या साहित्याचा वापर करावा. कापडी टॉवेल, रुमाल यांचा वापर केल्यास ते निर्जंतुक करून घ्यावेत. वापरावयाचे साहित्यदेखील दरवेळी निर्जंतुक करण्यासाठी डेटॉलचा वापर करावा. सर्व कारागिरांनी व दुकानात प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना मास्क वापरायला बंधनकारक आहे, त्यामुळे कोणताही धोका न पत्करता काळजीपूर्वक काम करून नाभिक व्यवसायाबद्दल विश्वासार्हता वाढवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment