नाभिकांनो , राज्यव्यापी अधिवेशनात मोठया संख्येने सहभागी व्हा : जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर
कणकवली : दिनांक २६ नोव्हेंबर २१
मुंबई येथे २ डिसेंबर रोजी बारा बलुतेदार, अलुतेदार, एनटी, डिएनटी, विजेएनटी, एसबीसी, एससी, एसटी व माइनॉरिटी मधील वंचित व उपेक्षित समाजाचे प्रथम राज्यव्यापी अधिवेशन संपन्न होणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक संघटनेचे सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष , सचिव , प्रमुख पदाधिकारी व सर्वसामान्य सभासद यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील बारा बलूतेदारांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक समस्यांवर उपाय योजना संदर्भात विचार विनिमय व धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्यव्यापी पहिले अधिवेशन "रंगशारदा सभागृह, वान्द्रे (बांद्रा), मुंबई" येथे गुरुवार, दि.२ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता होणार आहे.
अधिवेशनाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक राज्याचे ओबीसी कल्याण तथा मद्त व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार राहणार असून अध्यक्षता राज्याचे ओबीसी बहुजन नेते कल्याणराव दळे भूषविणार आहेत.
बारा बलुतेदार, अलूतेदार, एसबिसी, मायक्रो ओबीसिंच्या वंचित जातींच्या संविधानिक न्याय हक्कांसाठी प्रथम राज्यव्यापी अधिवेशन होणार असल्याची माहिती बारा बलुतेदार महासंघाचे सरचिटणीस चंद्रकांत गवळी यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत तरी ग्रामीण मजुरी, कौटुंबिक सेवा पुरविणारा, शेती औजारे, कला कौशल्यांची कामे, निवारा, उद्योग क्षेत्रात मिनी इंडस्ट्रीचा पाया ठरलेल्या बारा बलुतेदार धान्य स्वरूपात मोबदल्यावर वर्षानुवर्ष उदरनिर्वाह करत आलेल्या वर्गाच्या समस्या आजही तशाच पूर्ववत आहेत. त्यांचे दुःख, दारिद्र्य, अवहेलना, अन्याय हे प्रश्न आजही सुटले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती तर अत्यंत डबघाईची आहे. कोरोना काळात तर फारच हाल झाले. ह्या वर्गाना सत्तेत सहभागा शिवाय त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्याबरोबर शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी ठोस उपाय योजनांवर विचारमंथन होणार आहे. मेळाव्यात महासंघाचे प्रमुख पदाधिकारी व प्रत्येक समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी राज्यातील सर्व बलुतेदार घटकातील बांधवांनी मुंबई येथील अधिवेशनास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य संघटक विजय चव्हाण , प्रदेश सरचिटणीस राजन पवार व जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment